Ad will apear here
Next
प्रसाद शिरगांवकरांचे लेखन सखोल आणि विचार करायला लावणारे
'सुखांचे सॅशे' पुस्तकाचे प्रकाशन

पुणे :
‘कोणतेही लेखन माणसाला विचार करायला प्रवृत्त करत असेल तर ते कालातीत होते. तसेच लेखन वाचकांना आवडते. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेल्या तिन्ही पुस्तकांमधील लेखन हे विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. प्रसाद फेसबुकवर लिहितो, तरीही हे लेखन खूपच सखोल आहे हे पाहून खूप छान वाटले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी  काढले. 

सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांच्या ‘i-बाप’, ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन २९ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. कोथरूडमधील गांधी भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ‘i-बाप’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आणि अन्य दोन पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन या वेळी झाले. तसेच तिन्ही पुस्तकांच्या ई-बुकचेही प्रकाशन करण्यात आले. या वेळी कवी वैभव जोशी उपस्थित होते.

'i-बाप' पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. गोडबोले म्हणाले, ‘मी फेसबुक फारसे वापरत नाही. त्यामुळे तिथले लेखनही फारसे वाचलेले नाही. क्वचितच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरून येणारे लेखन वाचले आहे. ते टुकार असते असे माझे मत आहे; पण प्रसादने सगळेच लेखन फेसबुकवर केले असून, ते आज प्रकाशित होत आहे. प्रसादच्या तिन्ही पुस्तकांवर मी नजर टाकली. हे उत्कृष्ट दर्जाचे लेखन आहे. सध्या वाचण्याचा, ऐकण्याचा काळ कमी होत असल्यामुळे प्रसादने लहान-लहान लेख लिहिले आहेत. ते वाचल्यावर मला अल्बर्टो मोराव्हियाच्या ‘रोमन टेल्स’ या पुस्तकाची आठवण झाली. ते साधे-सोपे, पण विचार देणारे आणि सखोल लेखन आहे. फसवी नाती, खरी घरे-खोटी घरे, मैत्रीण हे लेख विशेष वाचण्याजोगे झाले आहेत.’

‘सध्या आपण कोण आहोत याऐवजी माझ्याकडे काय आहे हेच दाखवण्याची स्पर्धा सगळीकडे सुरू आहे. वस्तू साठवण्याकडेच सगळ्यांचा कल आहे. आयुष्यातील पोकळी वस्तूंनी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोक आत्मकेंद्री होत असल्याने एकूणात सगळे अधोगतीकडे चालले आहे. अशा काळात विचार करायला लावणारी ही पुस्तके वाचकांना थोडे शहाणे करू शकतील,’ असेही गोडबोले म्हणाले.

तत्पूर्वी, ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी प्रस्तावनेत ‘बुकगंगा’चा प्रवास आणि फेसबुकवर प्रसिद्ध असलेल्या लेखकांचे लेखन पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यामागची भूमिका सर्वांसमोर मांडली. लेखक प्रसाद शिरगांवकर आणि त्यांच्या पत्नी अल्पना यांनी तिन्ही पुस्तकांतील काही लेख आणि कवितांचे अभिवाचन केले.

अभिवाचन करताना प्रसाद शिरगांवकर आणि अल्पना शिरगांवकर

लेखक प्रसाद शिरगांवकर म्हणाले, ‘मी १९९८ला नोकरीनिमित्त बेल्जियमला गेलो, तेव्हा आजूबाजूला मराठी बोलणारे कुणी नव्हते. त्यातून मराठी ऐकण्याची, बोलण्याची तहान लागली. मराठीचा इंटरनेटवर शोध घेतला तर मायबोली नावाची वेबसाइट सापडली. तिथे लिहायला सुरुवात केल्यावर जगभरातील मराठी लोकांशी संवाद झाला. कुणी इंग्लंड, तर कुणी ऑस्ट्रेलियातून प्रतिसाद देत होते. तेव्हाच इंटरनेट या माध्यमाची ताकद लक्षात आली. तेव्हापासून लेखन सुरू आहे. फेसबुक पोस्टचे आयुष्य दोन तासांचे असते; पण २०१९मध्ये एकाने माझी २०१४मधली पोस्ट वाचून प्रतिक्रिया दिल्यानंतर माझे फेसबुकवरचे लेखन कालातीत आहे असे वाटले. ‘i-बाप’ पुस्तकात माझ्या आणि अल्पनाच्या पालकत्वाची कथा आहे. २२ वर्षांच्या जगप्रवासातील अनुभवांचे लेखन ‘भटक्याची डायरी’मध्ये केले आहे. आपल्याला आनंद देणाऱ्या लहान-सहान घटना-प्रसंगांचे वर्णन आणि माझे विचार ‘सुखांचे सॅशे’ या पुस्तकांतून मांडले आहेत. ते वाचकांना नक्कीच आवडतील.’

'भटक्याची डायरी' पुस्तकाचे प्रकाशन

प्राध्यापिका गौरी ब्रह्मे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले आणि ‘बुकगंगा’च्या आसावरी कुलकर्णी यांनी आभार मानले.

(ही तिन्ही पुस्तके किंवा त्यांचे संच घरपोच मागविण्यासाठी किंवा त्यांची ई-बुक्स खरेदी करण्यासाठी ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)









 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZZICK
Similar Posts
प्रसाद शिरगांवकरांच्या तीन पुस्तकांचे २९ फेब्रुवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेली, आगळावेगळा वाचनानुभव देणारी तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यात प्रकाशित होणार आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे आहेत. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत असून, प्रसिद्ध लेखक, आयटी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ
प्रसाद शिरगांवकरांची तीन पुस्तके वाचकांच्या भेटीला; २५ फेब्रुवारीपर्यंत प्रकाशनपूर्व सवलत पुणे : सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांची तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी वाचकांच्या भेटीला येत आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे असून, पुण्यातील ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास या पुस्तकांचा
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन पुणे : माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले
आयुष्यातील समस्यांची उकल शोधणे हाच अध्यात्म मार्ग पुणे : ‘प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेतच. त्या कुणालाही चुकलेल्या नाहीत. आपला जन्म कशासाठी झाला असा प्रश्न अनेकांना पडतो, तर त्याचे उत्तर ‘या समस्या सोडवण्यासाठीच’ असे आहे. समस्या संपल्या की जन्मच संपला. या प्रश्नांची उत्तरे शोधणे किंवा समस्यांची उकल शोधणे हेच खरे अध्यात्म आहे. गहन रूप असलेले अध्यात्म

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language